सर्वोच्च न्यायालयाचा खा. उदयनराजेंना दणका खिंडवाडी जागेचा निकाल बाजार समितीच्या बाजूने

सातारा  : बहुचर्चित आणि मोठी वादावादी पहायला मिळालेल्या खिंडवाडी येथील साडे पंधरा एकर जागेचा निकाल  सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूने झाला असून सर्वोच्च न्यायालयाने खा. उदयनराजे भोसले यांना दणका दिला आहे. दरम्यान, सर्व प्रकारची कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीच्या ताब्यात जागा मिळाली असून लवकरच या जागेवर स्व. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल उभारले जाईल, असे बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी सांगितले आहे. 


याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विक्रम पवार यांनी म्हटले आहे की, १९९० सालापासून खिंडवाडी येथील जागेसंदर्भात कायदेशीर लढाई सुरु होती. १९९० मध्ये खा. उदयनराजे यांच्या कुळांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. सुमारे १६ वर्ष उच्च न्यायालयाने सदर जागेवर काहीही करण्यास स्टे दिला होता. तसेच २००८ मध्ये कुळांनी पुणे आयुक्त यांच्याकडेही अपील केले होते. २०१० मध्ये पुणे आयुक्तांनी बाजार समितीच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर उच्च न्यायालयाने भूसंपादनाचे पैसे भरून जागेचा ताबा घेण्याचे आदेश बाजार समितीला दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाजार समितीने १२ लाख ५० हजार रुपये भरून जागेचा ताबा घेतला. 


२०११ मध्ये पुन्हा कुळांनी उच्च न्यायालयात अपील केले. तसेच २०१७ मध्ये खा. उदयनराजेंनी स्वतः याचिका दाखल केली. २०२२ मध्ये पुन्हा बाजार समितीच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर बाजार समितीने पोलीस बंदोबस्त घेऊन सदर जागेवर व्यापारी संकुल उभारणीचे काम हाती घेतले. मात्र खा. उदयनराजेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर निर्णय झाला नाही आणि तुम्ही जागा ताब्यात कशी घेताय, या मुद्दावरून वादावादी झाली होती. दरम्यान, शुक्रवार दि. १४ जुलै २०२३ रोजी (काल) दिल्ली सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. खा. उदयनराजेंच्या बाजूने देशातील ख्यातनाम असलेले वकील ऍड. अभिषेक मनुसिंघवी यांनी युक्तिवाद केला तर, बाजार समितीच्या वतीने ऍड. शाम दिवाण आणि ऍड. अभय अंतुरकर यांनी बाजू मांडली. 


बाजार समितीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राहय मानून सर्वोच्च न्यायालयाने खिंडवाडी जागेचा निकाल बाजार समितीच्या बाजूने दिला आहे. लवकरच स्व. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ केला जाणार असून काहीही झाले तरी, सुसज्ज व्यापारी संकुल जनतेच्या सोयीसाठी उभारले जाणार आहे. ज्यावेळी सदरच्या जागेवर वादावादी झाली होती त्यावेळी पोकलेनच्या साह्याने बाजार समितीचा कंटेनर तोडण्यात आला होता. त्याची नुकसान भरपाई म्हणून २ लाख १० हजार रुपये खा. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या बँक खात्यावर जमा केली आहे. सातारा तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासात भर घालणारा हा प्रकल्प बाजार समितीच्या सर्व संचालकांच्या पुढाकाराने लवकरच मार्गी लावला जाईल, असे विक्रम पवार यांनी म्हटले आहे.  

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला