साताऱ्यातील हिट अँड रन प्रकरणात पळून गेलेल्या वाहन चालकाला बारा तासांच्या आत पकडण्याची जबरदस्त कामगिरी

सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे व त्यांच्या टीमचा विद्युत वेगाने तपास

सातारा : साताऱ्यातील हिट अँड रन प्रकरणात दुचाकीला धडक देऊन पळून गेलेल्या वाहन चालकाला बारा तासांच्या आत पकडण्याची जबरदस्त कामगिरी सातारा तालुका पोलिसांनी फत्ते केली. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे व त्यांच्या टीमने विद्युत वेगाने तपासाची चक्रे फिरवून अपघात करून गेलेले वाहन व वाहन चालक यांना पोलीस ठाण्यात आणल्याने पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.

पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहराजवळ लिंबखिंड परिसरात शुक्रवारी सकाळी अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे झालेल्या अपघातात लिंब (ता. सातारा) येथील प्रसिद्ध व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ बाबू खादगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. याच परिवारातील एका युवकाचा दोन-तीन वर्षांपूर्वी याच परिसरात अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता. पण त्या अपघातातील वाहनाचा आजही तपास लागला नाही. त्यामुळे या अपघातानंतर खादगे यांचे नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला. अपघात करून गेलेल्या वाहन चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी निर्वाणीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेऊन आरोपीला शोधून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याच्या सूचना सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना दिल्या होत्या. इतकेच नव्हे तर ते सातत्याने निलेश तांबे यांच्याकडून तपासाबाबत माहिती घेत होते. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी अपघात करून गेलेल्या वाहनाच्या शोधासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या. घटनास्थळापासून अगदी एक्सप्रेस हायवेपर्यंत प्रमुख ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. यातून अपघात करून जाणाऱ्या वाहनाची ओळख पटली. सीएनजी गॅसचा पुरवठा करणारा हा टाटा कंपनीचा तामिळनाडू पासिंगचा (टीएन ८८ के १२८२) ट्रक निघाला. त्यानंतर अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने या वाहनाचा माग काढण्यात आला. शुक्रवारी रात्री लिंब येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच पुण्याजवळ महामार्गावर पोलिसांनी हा मालट्रक पकडून वाहनचालक कुवरबहादूर नवलकिशोर सिंग (वय २६, अमोर, कानपूर, उत्तर प्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या. पहाटे चार - सव्वा चारच्या दरम्यान वाहन व वाहन चालक यांना सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणले गेले. पोलीस निरीक्षक निलेश तांबे, पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे, हवालदार शिवाजी डफळे, राजू शिखरे, मालोजी चव्हाण आदींनी ही कामगिरी फत्ते केली.

सातारा तालुका पोलिसांची ही कामगिरी सर्वांनाच अचंबित करणारी ठरली आहे. कारण बेदरकार वाहन चालवून अनेक निष्पापांचे बळी घेणारे असे अपघात घडतात, पण बहुतेक प्रकरणात तपास लागत नाही. ही प्रकरणे 'हिट अँड रन' च्या यादीत सामावून जातात. पण अपघात करून महामार्गावरील वाहनांच्या अमर्याद गर्दीत मिसळून गेलेल्या वाहनाचा सातारा तालुका पोलिसांनी त्यांचा अनुभव व कौशल्य पणाला लावून अत्यंत कमी वेळेत तपास केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामगिरीमुळे सातारा पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला