मयत व्यक्तीला जिवंत दाखवून भूमिअभिलेख कार्यालयाने केली मोजणी

फलटण :  चक्क मयत व्यक्तीला जिवंत दाखवत जमिनीची मोजणी करून मृत व्यक्तीचा जबाब, बनावट सह्याही केल्याचा  अजब प्रकार वाई  भूमिअभिलेख कार्यालयातून नुकताच समोर आला आहे. याबाबतची तक्रार  बाबुराव गेनबा फणसे रा पांडेवाडी (ता. वाई) यांनी महसूल विभागात केली आहे.मोजणीच्या व किरकोळ कामासाठीही दहा दहा हेलपाटे मारायला लावून चिरीमिरी घेतली जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही झाल्या आहेत; परंतु चक्क मृतव्यक्तीला जिवंत दाखवून त्याचे जबाब घेण्याचा अजब प्रकार वाई भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केला असल्याचे बाबुराव फणसे यांनी तक्रारीत म्हटले आहे.तक्रारदार बाबुराव फणसे यांची गट नं. ६९ मध्ये शेतजमीन आहे. त्यांच्या शेजारी अमृता रामचंद्र भोसले यांचा गट क्र. ६४ आहे. या गटाची मोजणी अमृता भोसले यांनी २०२० मध्ये मागवली होती.

 भूमी अभिलेख विभागाच्यावतीने ही मोजणी २२ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली. लगतदार म्हणून फणसे यांना या मोजणीची नोटीसही रीतसर देण्यात आली होती. मोजणीच्याहद्दी ७ जानेवारी २०२१ रोजी कायम करण्यात आल्या. विशेष म्हणजे यातील अर्जदार अमृता भोसले या २० सप्टेंबर २०२० रोजी मयत झाले होते. ही बाब फणसे यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र या कर्मचाऱ्यांनी तब्बल १३ महिन्यानंतर मृत व्यक्तीला जिवंत दाखवत त्यांच्यासमोर मोजणी केल्याचा बनाव केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढ्यावरच संबंधित महाभाग न थांबता मृत भोसले यांचे जबाब स्वतः समक्ष घेऊन त्यावर त्यांच्या सह्या घेतल्या. हद्दी कायम करण्याच्या वेळीही असेच खोटे जबाब नोंदवण्यात आले. खोटे नकाशे बनवून माझ्या सुमारे १५ फूट क्षेत्रात घुसखोरी करण्यात आल्याचे फणसे यांनी तक्रारीत म्हटले आहे.ही बाब न्यायप्रविष्ट झाल्यानंतर सारवासारव करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने पुन्हा एक मोजणी करून केलेली चूक झाकण्याचा प्रयत्न केला असल्याचेही फणसे यांचे म्हणणे आहे. मृत व्यक्तीचे जाबजबाब घेऊन एका व्यक्तीच्या लाभासाठी दुसऱ्याचे नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी फणसे यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला