गोळीबार मैदान येथील शाळा भरतेय उघड्यावर

शाहूनगर : गोळीबार मैदान (ता. सातारा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शासनाच्या जिल्हा परिषद व पोलिस प्रशासनातील समन्वयाअभावी दयनीय अवस्था झाली आहे. शाळेच्या सर्व वर्गातील मुलांना धोकादायक स्थितीत असलेल्या खोलीमध्ये बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.गोळीबार मैदान येथे पोलिस वसाहतीच्या जागेत १९९७ मध्‍ये सातारा जिल्हा परिषदेने तत्‍कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या संमतीने प्राथमिक शाळा सुरू केली होती. पोलिसांची व इतर मजुरी करणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी वाताहत होऊ नये, यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली.
या शाळा व्यवस्थापनानेही मुख्य उद्देश लक्षात घेऊन या शाळेचा गुणवत्ता आजअखेर अबाधित ठेवली आहे. मात्र, अलीकडच्या काळात ही इमारत खूप जुनी झाल्या कारणाने धोकादायक स्थितीमध्ये आहे. इमारत बांधण्‍यासाठी जिल्हा परिषदेला पोलिस अधीक्षकांचा ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. येथील शिक्षकांनी व पालकांनी वेळोवेळी यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरवठा केला; परंतु या पाठपुराव्याला शासनाच्या दरबारी असलेली उदासीनता व त्याचबरोबर नियमावली व काही तांत्रिक अडचणीमुळे ही इमारत उभे राहण्यास अडचणीचे डोंगर उभे राहात आहेत. या इमारतीचा प्रस्ताव घेऊन येथील शिक्षकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठपुरवठा केला. मात्र, सरकारी नियम व कागदी घोडे नाचवत यामध्ये त्यांना यश आले नाही. ज्या गोष्टींचा पाठपुरावा अधिकाऱ्यांनी करायला हवा, त्या गोष्टीचा पाठपुरावा शिक्षक व पालकांना करावा लागत आहे, त्यामुळे शासनाची असलेली उदासीनता यातून दिसत आहे. 
त्यामुळे बाविसाव्या शतकात असलेल्या अधिकाऱ्यांना त्या काळच्या अधिकाऱ्यांएवढीही दूरदृष्टी नसलेली पाहायला मिळत आहे. शाळेची इमारत धोकादायक असल्यामुळे बऱ्यापैकी सर्व मुले वर्गासाठी बाहेर अंगणात झाडाखाली शिक्षण घेताना दिसत आहेत. काही वर्गांत दोन वेगळ्या वर्गांची मुले एकत्रित बसवावी लागत आहेत. त्यामुळे ज्या काही चांगल्या खोल्या आहेत, त्यामध्ये अधिक दाटीवाटी करून मुले बसलेली पाहावयास मिळत आहेत. त्याचसोबत या शाळेत शिक्षकांच्या दोन जागा कित्येक वर्षे रिक्त असून, त्याकडेही प्रशासनाचे लक्ष नाही. यासंदर्भात गुरुवारी खासदार उदयनराजे भोसले व संग्राम बर्गे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन रखडलेल्या कामासाठी समन्वय साधून ना हरकत प्रमाणपत्र मिळावे व लवकरात लवकर मार्ग काढावा, यासाठी निवेदन दिले आहे.
एसपी, सिईओंनी समन्वय दाखवा
जिल्‍हा परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी व सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख आपण दोघांनीही या शाळेला एकत्रित भेट देऊन झालेली दुरवस्था आपल्या डोळ्यांनी पाहावी. एकीकडे जिल्हा परिषदेने आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी आवश्यक भौतिक सुविधा देऊ, अशी ग्वाही दिली आहे व एकीकडे ही दुरवस्था झाली आहे, त्यामुळे त्या जागेवर आपल्या धडाकेबाज निर्णयाने आपण मार्ग काढावा व मुलांचे भवितव्य उज्ज्वल करावे, ही मागणी पालकांकडून होते आहे.
काम लांबणीवर का पडले?
जिल्हा परिषद व पोलिस प्रशासन यांच्या समन्वयातून या शाळेसाठी आधीच मार्ग निघाला असता मात्र व्यवस्थापनाने या गोष्टीसाठी टाळाटाळ केली. ज्या गोष्टीचा पाठपुरावा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करायला हवा. त्या गोष्टीचा पाठपुरावा सामान्य पालकांना का करावा लागत आहे? इतकी वर्षे मार्ग न काढता केवळ नियमांचे कागदी घोडे का नाचले गेले? याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी पालक व तेथील नागरिकांमधून होत आहे.जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची मोठी दुरवस्था झाली आहे. या शाळेच्या नवीन इमारत उभारणीसाठी मी सातत्याने जिल्हा परिषद व पोलिस विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. एमएसईबीची देखील मेनलाइन या इमारतीवरून गेली आहे. या शाळेमध्ये अनेक गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत असून, इतर शाळेमध्ये जाणे त्यांना परवडणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर या शाळेची नवीन इमारत उभी राहावी, अशी आमची मागणी आहे.
- संग्राम बर्गे, सामाजिक कार्यकर्ते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला