महाबळेश्वरच्या देदीप्यमान शैक्षणिक वाटचालीतील मानाचं पान म्हणजे 'महाबळेश्वर शिक्षण महोत्सव.

स्वर्गीय बाळासाहेब भिलारे नगरीमध्ये प्रवेश करताच एक भारावलेल्या वातावरणात प्रवेश केल्याची अनुभूती येते..भव्य सभामंडप, सनईचा सूर आकर्षक रांगोळी, प्रथितयश मान्यवर ,विविध सांस्कृतिक पेहरावत वावरणारे शिक्षक, विद्यार्थ्यांचा बालचमू, पालक, अधिकारी वर्ग, उत्कृष्ट व्यासपीठ रचना,  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  NEP  अंतर्गत सजलेले आकर्षक शैक्षणिक स्टॉल त्यामधून शिक्षकांनी केलेले कला कौशल्य... महोत्सवाच्या अनुषंगाने तमाम शिक्षक बांधवांची लगबग... असं हे प्रथमदर्शी दिसणारं चित्र म्हणजेच महाबळेश्वरच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीचं प्रतिबिंबच...

                शिक्षण महोत्सवाच्या    अनुषंगाने मा. गटशिक्षणाधिकारी पळसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली  विविध समित्यांची रचना करण्यात आली. प्रत्येक समिती आपले 100% टक्के योगदान देऊन महोत्सव यशस्वी कसा होईल? यासाठी आपले योगदान देताना दिसत होतीत..
      
              प्रवेशद्वारापासून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली...महाबळेश्वरच्या सर्व शिक्षकांचा सहभाग असणारी ग्रंथ दिंडी महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतून आराम चौक ते पुन्हा पंचायत समिती महाबळेश्वर इथपर्यंत अत्यंत दिमाखात सुरू झाली..छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतापभूमी असणाऱ्या या महाबळेश्वर तालुक्यामध्ये आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीतून अनमोल ग्रंथांची ग्रंथ दिंडी काढण्यात आली. तेजाची आणि क्रांतीचे प्रतीक असणारे शैक्षणिक ज्योत प्रज्वलित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात शिवराय व त्यांचे एकनिष्ठ मावळे...त्या पाठोपाठ महाराष्ट्राला असणारी वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारे टाळ मृदंगाच्या गजरात विठुरायाचा गजर करणारे वारकरी...विद्यार्थ्यांच्या ढोल पथकात  रममाण  झालेल्या पावलांनी शिक्षणाचा जागर आणि  शिक्षणाचा गजर करत अवघी महाबळेश्वर नगरी दुमदुमली...

            शिक्षण महोत्सवाच्या आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ज्येष्ठ कवी, साहित्यिक मा.अरुण म्हात्रे...महाबळेश्वर तालुक्याचे विकास व सहकाररत्न मा.राजेंद्रशेठ राजपुरे तथा अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत एका दिमाखदार सोहळ्यास सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन...स्वर्गीय बाळासाहेब भिलारे (दादा) व  विद्येची देवता सरस्वतीमाता प्रतिमा पूजन संपन्न झाले..महाबळेश्वर तालुका सारेगमप शिक्षक मंचाने सुरेल आवाजात महाराष्ट्र गीत, ईशस्तवन ,स्वागतगीत गात शिक्षण महोत्सवाची संगीतमय सुरुवात केली..

              महाबळेश्वरच्या नवपर्वाची ओळख करून देताना आपल्या प्रास्ताविकात मा.गटशिक्षणाधिकारी पळसे साहेब यांनी होय..."माझ्या महाबळेश्वरची शिक्षण व्यवस्था बदलत आहे"...भविष्यवेधी शिक्षणाची कास धरत आहे. शिष्यवृत्ती, इन्स्पायर अवार्ड, विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा क्रीडा स्पर्धा यामध्ये महाबळेश्वर तालुक्याने केलेली कामगिरी इ .बाबींवर प्रकाश झोत टाकत प्रास्ताविकातून उपस्थित सर्वांनाच नवचेतना दिली.मा.पळसे साहेबांच्या अमोघ वाणीतून निघणारा शब्द-शब्द प्रत्येक जण आपल्या मनामनात साठवत होता. प्रत्यक्ष मा. कवी अरुण म्हात्रे हे देखील पळसे साहेबांच्या वाणीने प्रभावित झाले. "तुमच्या वाचनाचे, तुमच्या साधनेचे प्रतिबिंब प्रकटते आहे. तुम्ही नक्कीच कवी अथवा साहित्यिक आहात, तुमच्या जीव्हेवर साक्षात सरस्वती वसली आहे".असे गौरव उद्गार मा. अरुण म्हात्रे यांनी काढले..
  
           कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजेंद्र शेठ राजपुरे यांनी महाबळेश्वर शिक्षण विभागाचे भरभरून कौतुक केले. माझा महाबळेश्वर जिल्ह्यात, राज्यात अग्रेसर ठरतोय हे बाब अत्यंत भूषणावह आहे. महाबळेश्वर शिक्षण विभागातील प्रत्येक घटक आपापले योगदान देत असल्यामुळे पळसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वाटचालीचे चळवळीत रूपांतर झाल्याचे दिसून येते. असे प्रतिपादन मा. राजेंद्रशेठ राजपुरे यांनी केले.
   
           आजच्या पहिल्या दिवसाचे खास आकर्षण शिक्षक कवी संमेलन...मा.अरुण म्हात्रे ज्येष्ठ कवी व साहित्यिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. सुनील शेडगे  पत्रकार, प्रवासवर्णनकार, साहित्यिक यांचे अध्यक्षतेखाली व डॉ. योगिता रासकर कवयित्री यांच्या उपस्थितीत कवी संमेलनास प्रारंभ झाला.  सर्वप्रथम मा.अरुण म्हात्रे यांनी अनेक नामवंत कवींच्या कविता, स्वरचित कविता, प्रेमरचना, अलवार...तरल...खट्याळ...मिश्कील... विनोदी... विविध रंगांनी भरलेल्या कवितांचा अनोख्या शैलीत रसास्वाद दिला. इतके सुंदर शब्द आणि भावनांचा सुरेख संगम... निव्वळ भान हरपून गेले .शब्द आणि विचार यांच्या प्रणयातून कविता जन्म घेते आणि एखाद्या रसिकाची ती अलगद प्रियसी होते. स्वच्छ, निर्मळ पवित्र शब्दांनी गुंफलेल्या भावनांची माळ या हृदयाशी त्या हृदयाला सहज जाऊन स्पर्श करत होती... शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणूनी ..विलक्षण... विलक्षण... जणू मर्मबंधातली ठेवही ... रसिकांच्या ओठी अहाहा..अन् क्या बात है...
  
          महाबळेश्वर तालुक्यातील २२ नवोदित कवी कवयित्रींनी आपल्या स्वतंत्र लेखन शैलीतील कविता सादर केल्या. यावर अतिशय मार्मिक प्रतिक्रिया मा. म्हात्रे सर यांनी दिल्या. आणि खऱ्या अर्थाने महाबळेश्वर शिक्षण विभागातील कवींना नव  प्रेरणा मिळाली..खरंतर 'आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला कौतुकाचा हा किनारा पावला नि  धन्य झाला'...अशीच अनुभूती या दरम्यान आली...याच दरम्यान शीघ्र कवी असणारे, साहित्यिकांच्या मांदीयाळीतील उत्कृष्ट वक्ता, निवेदक, वाचक, सहृदयी मित्र स्व. चंद्रकांत आखाडे यांची आठवण सर्वानाच प्रकर्षाने झाली..

                काव्यरचना निर्मिती काव्य सादरीकरण, काव्यातील भावोत्कटता अशा विविध बाबींवर कटाक्ष टाकत सर्वच नवोदित कवींना अत्युच्च दर्जाचं मार्गदर्शन मा. म्हात्रे सर यांनी केले. सर्व कवींच्या कविता ऐकून स्वतः म्हात्रे साहेब प्रभावित झाले आणि सर्व कवींना त्यांचा  'विसरता येत नाही'  हा कवितासंग्रह देऊन  सन्मान केला.

              शिक्षण विभागामार्फत ही सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, मानाची शान देऊन सर्व कवींचा सन्मान केला गेला. यादरम्यान कलासक्त व्यक्तिमत्व श्री. नितीन भाई भिलारे, सौ.योगिता रासकर श्री.ज्ञानेश सूर्यवंशी श्री. सुनील शेडगे आदी मान्यवरांचा म्हात्रे साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

               सर्वात शेवटी महाबळेश्वरचे युवा गायक श्री. संदीप आखाडे यांच्या अवीट मंत्रमुग्ध आणि स्वर्गीय सुरांनी आजच्या दिवसाचा समारोप होत होता..दरम्यान उत्साहाचा अखंड झरा असणारे अरुण म्हात्रे यांनाही मोह आवरला नाही. आणि त्यांनीही  'गुलाबी आखे जो तेरी देखी' या गीतावर आपल्या आवाजाची जादू रसिकांवर केली. आजच्या संपूर्ण दिवसाचे सूत्रसंचालन अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये, दमदार आवाजामध्ये श्री.पुरुषोत्तम माने ,श्री. संजय सकपाळ व  श्री.प्रमोद पवार यांनी केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन श्री. सुशांत मोतलिंग यांनी केले..

            खरंतर आजचा शिक्षण महोत्सवाचा हा पहिला दिवस म्हणजे शाब्दिक मोती आणि सांगितिक माणिक यांची मालिकाच म्हणावी लागेल, अगदी एक लख्ख अनुभव ...पाहताना आणि ऐकताना जो आनंद होतोय तो शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही...

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला